प्रियकराचा अचानक लग्नाला नकार, संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दोघे आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर प्रेमसंबंध जुळले. दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपासून दोघे एकत्र राहात होते. परंतु प्रियकराने अचानक लग्न करण्यास नकार दिला आणि तो मुलगी पाहण्यासाठी निघून गेला. याच नैराश्यातून तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगी येथे बुधवारी उघडकिस आली. प्रियकराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

श्वेता बिस्वास (२९) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तर  सचिन बबन काशीद (२९, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता बिस्वास आणि सचिन काशीद दोघेही संगणक अभियंता म्हणून काम करत होते. त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही सोबत राहात होते. दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले होते. त्यातच सचिन एके दिवशी लग्नासाठी मुलगी पाहायला गेला होता. त्यावेळी दोघांत वादही झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याने अचानक तिला लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री सचिन हा कामावर गेला तेव्हा तिने राहत्या घरात फुरसुंगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तो कामावरून परतला तेव्हा हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी सचिन काशीद याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. एस. लोंढे करत आहेत.

 

You might also like