Nashik News : सोशल मिडियाची कमाल ! हरवलेला मुलगा पालकांच्या मिठीत

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडिया म्हटले की अनेक दुरुपयोग होत असतात, मात्र यामुळे काही चांगल्या गोष्टी देखील घडत असतात, याचा काहीसा प्रत्यय नाशिकमध्ये पाहायला मिळाला. एका व्हॉट्सॲप ग्रुपमुळे गायब झालेल्या 14 वर्षाचा मुलगा सापडला. दुरावलेला मुलगा मिठीत विसावल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

ऋषी नीलेश सानप (वय 14) असे गायब झालेल्या मुलाचे नाव आहे. तो गुरुवारी अचानक गायब झाला होता. त्याच्या शोधासाठी त्याच्या पालकांनी जंगजंग पछाडले. पण काही करता मुलगा सापडेना. ही बाब सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी जगदाळे यांना कळाली. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मुलाचे छायाचित्र टाकून मुलगा सापडल्यास कळवावे, असे आवाहन केले.

त्यानुसार ग्रुपवरील सदस्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यांपैकी दोघाना हा मुलगा सापडला. त्यांनी पोलिस ठाण्यात त्याला स्वाधीन केले, तर मुलगा सापडल्याचे पुन्हा सोशल मीडियावर टाकले. यावरून ग्रुपमधील काही सदस्यांनी त्यांच्या पालकांच्या कानावर ही बाब टाकली. पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात येऊन मुलास ताब्यात घेतले.