अठरा विश्व दारिद्रयातून केले यशाचे शिखर सर, फुटाणे विकणारा मुलगा होणार आता डॉक्टर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – घरात अठरा विश्व दारिद्र्य पाचवीलाच पुंजलेले… आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची… आई-वडील गाड्यावर फुटाणे- बत्तासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा परिस्थितीतही त्याने डॉक्टर व्हायचे असे ध्येय समोर ठेवून प्रयत्नाची पराकाष्ठा अन् परिस्थितीशी संघर्ष करत झटून अभ्यास केला. प्रसंगी त्यानेही फुटाणे विकले आणि आता त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेत त्याला 750 पैकी 625 गुण मिळाले आहेत. एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तो पात्र ठरला आहे. ही आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील रामप्रसाद जुनगरेची यशोगाथा!

येथील अय्यप्पास्वामी मंदिराच्या बाजूच्या वस्तीतील एका झोपडीत रामप्रसाद आई-वडिलांसोबत राहतो. जुनगरे कुटुंबाची सर्व मदार फुटाणे-बत्तासेच्या गाड्यावर. वडिलांना व्यवसायात हातभार लावत रामप्रसादने जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. दहावी पार करेपर्यंत त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. पुढे त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी थेट शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाण्या-या पुणे गाठले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात 11वी 12 साठी शिक्षण घेत असताना तो महापालिकेच्या वसतिगृहात राहून अभ्यास जिद्दीने अभ्यास करायचा. त्याच्या अभ्यासूवृत्तीची दखल घेऊन पुण्यातील ‘लाइफ फॉर एम्प्लिमेंट’ या संस्थेने त्याला अभ्यासासाठी मार्गदर्शन तसेच मदत पुरविली. यामध्ये डॉ. अतुल ढाकणे यांचे त्याला सहकार्य मिळाले. दरम्यान रामप्रसादला वैद्यकीय अभ्यासक्रमाला मदत मिळावी, यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. याबाबत रामप्रसादचे वडील फकीरराव जुनगरे म्हणाले की, कष्टामुळेच त्याला हे यश मिळाले आहे. पुण्यात शिकत असताना गावी आल्यानंतर देखील तो न लाजता आम्हाला गाड्यावर फुटाणे- बत्तासे विकण्यासाठी मदत करत असे.