‘बॉयकॉट चायना’मुळं चीनचं मोठं नुकसान ! 30 ते 50 टक्क्यांपर्यंत व्यापार बुडणार असल्याचं ‘ड्रॅगन’नं सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्य दलाच्या संघर्षानंतर देशात सुरू झालेल्या ‘बॉयकॉट चायना’ मोहिमेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. आता खुद्द चीनने कबूल केले आहे की यामुळे त्यांचे बरेच नुकसान होईल आणि यावर्षी भारताशी व्यापार 30 ते 50% कमी होऊ शकेल. भारताशी व्यापार फायद्याचा असल्याने (जास्त निर्यात, कमी आयात) चीनला कमी व्यापारामुळे मोठा तोटा होईल.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, ‘चीनविरूद्ध भारतातील वाढत्या राष्ट्रवादाचा परिणाम आर्थिक विषयांवर झाला आहे. कोविड -19 सोबत जोडले तर द्वीपक्षीय व्यापार यावर्षी 30% कमी होईल आणि ही घसरण 50% पर्यंत असेल.’

ग्लोबल टाईम्सच्या लेखात शेनझेन युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ बे ऑफ बंगाल स्टडीजचे संचालक डाय योन्गॉन्ग यांनी लिहिले आहे की, ‘सीमेवरील भारत-चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर काही राजकारणी आणि माध्यमांकडून राष्ट्रवादाला चालना दिली जात आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याव्यतिरिक्त देशातील बंदरांवर मालवाहू तपासणी वाढविण्यात आली आहे. हा संघर्ष होण्यापूर्वी चिनी कंपन्यांद्वारा अधिग्रहण रोखण्यासाठी परकीय गुंतवणूकीबाबतच्या तपासणीत वाढ केली गेली.’

या लेखात असेही म्हटले आहे की भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांत सुदृढ संबंध निर्माण झाले आहेत. ऑटो मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकम्युनिकेशन आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात दोन्ही बाजूंना फायदा होत आहे. अनेक भारतीय उद्योगांना बॉयकॉट चायना परवडणार नाही. भारताला पर्याय शोधण्यास बराच काळ लागेल आणि बरीच मेहनत घ्यावी लागेल. नवीन उद्योग उभे करावे लागतील किंवा अन्य देशांतून गुंतवणूक आणावी लागेल. या लेखात अशी आशा व्यक्त केली आहे की सीमेवरील शांततेने आर्थिक संबंध सामान्य होतील.

15 जून रोजी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या सैनिकांनी फसवणूक व षडयंत्रांतर्गत भारतीय सैनिकांवर हल्ला केला ज्यामध्ये 20 सैनिक शहीद झाले. भारतीय सैनिकांनी चीनलाही चोख प्रत्युत्तर दिले व त्यातून चीनचे बरेच सैनिक मारले गेले. तथापि, चीनने अद्याप या दुर्घटनेची नोंद केलेली नाही. या दरम्यान भारत आर्थिक बाबींवर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी बॉयकॉट चायना मोहीम राबवित आहे. लोक चिनी वस्तू न खरेदी करण्याचा संकल्प करत आहेत तर अनेक राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांशी असलेले करार रद्द केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like