बुरहान वानीच्या गावाचा मतदानावर बहिष्कार ; पुलवामात झाले ‘एवढे’ मतदान

श्रीनगर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यासाठी काल काश्मीर खोऱ्यात मतदान पार पडले. खूप कमी प्रमाणात मतदान या भागात झाले. अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यात केवळ २.८१ टक्के मतदान झाले. तीन वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा बुरहान वानी याच्या गावात शून्य टक्के मतदान झाले. गावातील लोकांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला. त्यामुळे या गावात एकाही मताची नोंद झाली नाही.

लडाखमध्ये ६३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह पहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच शोपियाँत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामुळेच इथे मतदान कमी झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा कायम राखण्यासाठी मी मतदान करणार आहे. आम्हाला आमचा असा प्रतिनिधी हवा आहे जो आमच्या चांगल्या भविष्यासह आमचा इतिहासही शाबूत ठेवेल असे शोपियाँतील मनलू गावातील तरुण अब्दुल हमीद म्हणाला.