तिनं लग्न करण्याचा लावला तगादा, प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह थेट भिंतीत पुरला अन् केलं बांधकाम

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना एका खळबळजनक अशी बाब समोर आली. जिल्ह्यातील डहाणूपासून जवळ असलेल्या वाणगावमधील वृंदावन या इमारतीत एका फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या प्रियकराला हत्येच्या आरोपांखाली ताब्यात घेतला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४ महिन्यांपासून अमिता मोहिते ही तरुणी आपला प्रेमविवाह करण्यासाठी घरातून निघून गेली. पंरतु, ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. या काळात तरुणीचा प्रियकर तिचा सोशल मीडियाचा वापर करुन व्हॉट्सॲपद्वारे घरच्यांसोबत त्यांची मुलगी बोलत असल्याचे भासवून संपर्क साधत होता. पण तरुणीच्या कुटूंबाला संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.

पोलीस तपासात तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्याची केल्याची कबुली प्रियकराने दिली. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली प्रियकराला ताब्यात घेतले. यात धक्क्कादायक गोष्ट अशी की फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं. त्याशिवाय तो याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून वास्तव्यास आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.