Pimpri News : प्रियकरानेच केले प्रेयसीच्या पतीवर फायरिंग, 3 जणांना अटक

सांगवी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये 9 जानेवारी रोजी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीवर फायरिंग केल्याची घटना घडली होती. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री अकराच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपी हा फिर्यादी यांच्या पत्नीचा जुना प्रियकर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तीघांना अटक केली आहे.

जसप्रितसिंग अमरजितसिंग सत्याल (वय-30 रा. औरंगाबाद),सुनील भगवान हिवाळे (वय-28 रा. श्रीकृष्ण नगर हडको), आनंद उर्फ दादुस मोहन इंगळे (वय-27 रा. उल्हासनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील हिवाळे याला औरंगाबाद पोलिसांनी अटक करुन सांगवी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी आनंद सोळंकी (रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी (दि.9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर जुनी सांगवी येथून पायी चालत जात असताना पाठिमागून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर फायरिंग केले होते. यामध्ये त्यांच्या कानाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या पत्नीचा पुर्वीचा प्रियकर जसप्रितसिंग सत्याल याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने सुनिल हिवाळे यांच्या मदतीने कट रचून साळुंके यांच्यावर फीयरिंग केल्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेऊन रविवारी (दि.18) रात्री आठवाजता आनंद उर्फ दादुस इंगळे याला अटक केली. या गुन्ह्यात आणखी काही बाबींचा खुलासा होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेला दादुस इंगळे याच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, प्रविण पाटील, नितीन खोपकर, शशीकांत देवकांत, पोलीस शिपाई विजय मोरे, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, महिला पोलीस शिपाई नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.