‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे प्लास्टर करून मृतदेह पुरला

भोपाळ : ‘दृष्यम’ या हिंदी चित्रपटात ज्याप्रकारे एका तरुणाची हत्या करण्यात येते आणि त्यानंतर त्याला पोलिस ठाण्याच्या इमारतीतच पुरण्यात येते, हा सीन तुम्हाला लक्षात असेल. तशाचप्रकारे एक हत्याकांड घडले. मध्य प्रदेशच्या खरगोन येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संतोष नावाच्या एका व्यक्तीने आपली विवाहित प्रेमिका छायाबाई हिची हत्या करून तिला आपल्याच नव्या घराच्या खडड्यात पुरले. इतकेच नाही तर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर सिमेंटने प्लास्टरही करण्यात आले.

दरम्यान, छायाबाई या त्यांचे वडील भायराम यांच्या मोहनखेडी गावातील राहत्या घरातून 30 डिसेंबरला अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर 3 जानेवारीला नातेवाईकांनी भीकनगाव ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

प्रियकरही गावातून गायब

महिला गायब झाल्यानंतर त्यापाठोपाठ प्रियकर संतोषही गावातून गायब झाला. पोलिस आणि गावकऱ्यांना वाटले की, दोघेही गाव सोडून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पण कोणताही पुरावा हाती लागला नाही.

असा लागला छडा…

26 जानेवारीला संतोषच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना एक सिमेंटचे प्लास्टर दिसले. त्यानंतर पोलिसांनी सिमेंटचे प्लास्टर खोदले. तेव्हा त्यांना बांगड्या दिसल्या. आणखी खोदकाम केल्यानंतर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.