अन् तिनं इमारतीवरून उडी मारून स्वतःला संपवलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. ॲलेक्सीस रुग्णालयाच्या मागच्या भागात मंगळवारी दुपारी 3 ज्या सुमारास हा प्रकार घडला, ज्याने परिसरात खळबळ उडाली. अंकिता कृष्णराव माकोडे (वय 24) असे मृत तरुणीचे नाव आहे. पाचपवलीच्या जामदार वाडीत ती राहत होती.

मानकापूरच्या एका कंपनीत ती चार महिन्यांपासून सेल्स एक्झिकेटिव्ह म्हणून कार्यरत होती. या कंपनीचे कार्यालय राज पॅलेस नावाच्या बहुमजली इमारतीत आहे. अंकिता नेहमी प्रमाणे कामाला गेली होती. बराच वेळी ती प्रियकरांशी मोबाइलवर बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर नैराश्याने ती दुपारी 3 च्या सुमारास चौथ्या मजल्यावर गेली आणि तेथून खाली उडी मारली. उंचावरुन उडी मारल्याने तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

इमारतीवरुन उडी मारल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. तोपर्यंत अंकितासोबत काम करणारे तिचे कार्यालयीन सहकारी देखील तेथे पोहोचले. अंकिताची ओळख पटल्यानंतर तिच्या पालकांशी संपर्कसाठी त्यांनी ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलीस अंकिताच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.