प्रियकराने ‘तसल्या’ फोटोसाठी तगादा लावल्याने प्रियेसीने केली आत्महत्या

कोलकाताः पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराने सातत्याने न्यूड फोटोची मागणी केल्याने एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी (दि. 4) ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला अटक करण्याची मागणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. पण मृत मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट न लिहिल्याने मृत्यूच्या कारणाबाबत संभ्रम झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणी मृत मुलीच्या वडीलांनी बानरहाट पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे धुपगुरी गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. आरोपी तरुण  तिच्याकडे सातत्याने न्यूड फोटोची मागणी करत होता. मुलीने असे फोटो पाठवण्यास त्याला अनेकदा नकार दिला. पण हट्टाला पेटलेल्या प्रियकराने तिच्यावर दबाब आणायला सुरुवात केली. तसेच ब्रेकअप करण्याची धमकीही दिली. प्रेमसंबंध तुटण्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगी तिच्या प्रेमसंबंधामुळे खूप दबावात जगत होती. याच कारणामुळे तिने टोकाच पाऊल उचललं असण्याची शक्यता आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.