आता ‘या’ मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचेही २२ जानेवारीला मुंबईत धरणे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने २२ जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून, सामाजिक विडंबनातून मुक्तता करावी, ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची व आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी, महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज हा लोकसंख्येने १० टक्के असतांनाही फक्त ३ टक्के संबोधला जातो, तरी ब्राह्मण लोकसंख्येचा सर्वे करण्यात यावा, समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, जिल्ह्याच्या ठिकाणी ब्राह्मण मुला, मुलींच्या शिक्षणाकरीता वस्तीगृह स्थापन करावे, समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, पौरोहित्य करणाऱ्या समाज बांधव यांना ५ हजार रुपए मासिक मानधन देण्यात यावे, कुळात गेलेल्या जमीनी परत कराव्यात या व इतर मागण्यांचा समावेश आहे.

निवेदनावर संजय देशपांडे, अमित कुलकर्णी, रवींद्र देशपांडे, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, अनंत वाघमारे, जगदीश गौड, एल. आर. कुलकर्णी, मधुसूदन दंडारे, अरविंद जोशी, गोविंद मामडगे, संजय मोहिदे, दीपक रणनवरे, लक्ष्मी देशपांडे, संध्या कुलकर्णी, लक्ष्मी देशपांडे, सुजाता कुलकर्णी, सचिन लंके व इतरांची नावे आहेत.