एक लाखाची लाच घेणारा शाखा अभियंता अँटी करप्शन जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अतिक्रमण पाडण्याची धमकी देत १ लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन राघोबा कांबळे आणि खासगी व्यक्ती विजय निकाळजे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीन भावसिंगपूरा भागात डी पी रोडवरील अतिक्रमण पाडण्याचे काम ४ दिवसापासून हाती घेण्यात आले आहे. वामन कांबळे हे या पथकाचे प्रमुख आहे. मनपाने तक्रारदार यांच्या घराच्या पायऱ्या आणि भिंतीवर लाल खुणा केल्या होत्या. तुमचे बांधकाम सोमवारी पाडणार असल्याची धमकी अभियंता वामन कांबळे यांनी दिली होती. महापालिकेने कारवाई करु नये, यासाठी अडीच लाख रुपये लाच कांबळे यांनी मागितली होती.

यावेळी खासगी व्यक्ती निकाळजेने मध्यस्थी केली. तेव्हा कांबळे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीत कांबळे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी सायंकाळी सापळा लावून वामन कांबळे व खासगी व्यक्ती विजय निकाळजे यांना पकडण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक ब्रम्हदेव गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/