काश्मीर : फक्त 10 मिनिटांमध्ये केला 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’, कमांडन्ट संतो देवीच्या ‘शौर्या’चा कारनामा

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लावेपोरा परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लावेपोरा ऑपरेशनचे नेतृत्व सीआरपीएफच्या 73 बटालियनच्या कमांडन्ट संतो देवी करत होत्या. दहशतवादी उत्तर काश्मीरमधून श्रीनगरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्रीनगर बरमुल्लाह राष्ट्रीय महामार्गावर लावेपोरामध्ये या बटालियनने नाकाबंदी केली होती आणि संशयित वाहनांची तपासणी घेतली जात होती. यावेळी एका स्कूटीवरून तीन लोक हेल्मेट न घालता येताना दिसले.

जेव्हा त्यांना थांबवण्यात आले तेव्हा मागे बसलेल्या व्यक्तीने पिस्तुल काढुन फायरिंग करण्यास सुरूवात केली. ताबडतोब संतो देवी यांनी मोर्चा सांभाळला आणि रस्त्यावरच 2 दहशतवाद्यांना ठार केले. तिसरा दहशतवादी गंभीर जखमी झाला असून तो स्कूटी घेऊन फरार झाला. परंतु, थोड्याच अंतरावर त्यालाही अटक करण्यात आली. हरियाणाच्या रहाणार्‍या संतो देवी मागील 33 वर्षांपासून सीआरपीएफमध्ये तैनात आहेत. संतो देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण ऑपरेशनला केवळ 10 मिनिटांचा वेळ लागला. परंतु, आयुष्यातील सर्वात कठीण ऑपरेशन होते असे त्यांनी सांगितले. या चकमकीत त्यांच्या कंपनीचा एक जवान शहीद झाला.सीआरपीएफच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी या पथकाला ऑपेरशनसाठी संतो देवी यांना शुभेच्छा दिल्या.

संतो देवी यांनी पूर्वीसुद्धा आपला पराक्रम दाखवला आहे. 2005 मध्ये अयोध्येत रामलल्ला परिसरात झालेला दहशतवादी हल्ला मोडून काढणार्‍या टीममध्ये त्या सहभागी होत्या. सीआरपीएफच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी या टीमला ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आणि तिसरा दहशतवादी जखमी झाला आहे. त्याच्यावर श्रीनगरच्या स्टेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सुरक्षा दलांच्या माहितीनुसार चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुल आणि काही ग्रेनेड जप्त केले आहेत.