नगरमधील रणरागिणींनी बंदी झुगारत घेतले काशीविश्वेश्वराचे दर्शन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील काशीविश्वेश्वराच्या प्राचीन मंदिरामध्ये महिलांना बंदी होती. मात्र, नगरमधील महिलांनी हर हर महादेवचा गजर करत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे महिलांना प्रवेश देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय तंटामुक्ती समितीच्या मध्यस्तीनंतर ग्रामस्थांनीच घेतला होता. महादेवाच्या दर्शनाने आनंदित झालेल्या महिलांनी याबद्दल ग्रामस्थ व मंदिर व्यवस्थापनाचेही आभार मानले.

[amazon_link asins=’B015WIOFRS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e79ff254-aa73-11e8-b701-f19826748c54′]

गुंजाळवाडीतील या प्राचीन मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. पंचक्रोशीतील महिलांनी अनेकदा दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळण्याची मागणी केली. मात्र, महिलांची ही मागणी प्रत्येकवेळी विविध कारणे सांगून नाकारली जात होती. अखेर गावातील तंटामुक्ती समितीसमोर हा प्रश्न मांडण्यात आला. गावातील अनिष्ट प्रथा व चालीरिती नष्ट करण्याचे उद्दिष्ट तंटामुक्ती समितीचे असल्याचे गृह विभागाने १४ ऑगस्ट २००८ रोजी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन तंटामुक्ती समितीने २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याची सूचना ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनीदेखील या मागणीला पाठिंबा दिला. त्यानुसार काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना अटकाव न करता गाभाऱ्यामध्ये प्रवेश द्यावा,असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

मंदिर प्रशासनाला या ठरावाची माहिती देऊन महिलांना प्रवेश नाकारल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर मंदिर प्रशासनानेसुद्धा सोमवारचे औचित्य साधून काशीविश्वेश्वराच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन शेकडो महिलांनी दर्शन घेतले. मंदिर समितीने सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.