कोरोना : मृतांच्या बाबतीत इटलीच्या पुढे गेला ब्राझील, 24 तासात 1473 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर जगभरात सतत वाढत चालला आहे. संपूर्ण जगात रोज सुमारे एक लाख नवीन रूग्ण समोर येत आहेत. या दरम्यान ब्राझीलसाठी हा व्हायरस एक आव्हान ठरला आहे. मागील चोवीस तासात ब्राझीलमध्ये या व्हायरसमुळे 1,473 लोकांचा मृत्यू झाला आहे, यासोबतच ब्राझीलमध्ये आतापर्यंत 34 हजारपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात ब्राझीलने आता इटलीला मागे टाकले आहे. कोरोना संकटाच्या सुरूवातीला इटलीमध्ये परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, आता तेथे सर्वकाही ठिक आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत एकुण 34021 मृत्यू, तर इटलीमध्ये 33,689 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या प्रकरणात अजूनही अमेरिका सर्वात पुढे आहे, तेथे एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍या नंबरवर युके आहे जेथे चाळीस हजार मृत्यू झाले आहेत.

ब्राझीलसाठी चिंतेची बाब ही आहे की, तेथे आतापर्यंत जेवढ्या टेस्ट झाल्या, त्यापैकी सुमारे 60 टक्के लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. आतापर्यत ब्राझीलमध्ये सव्वा नऊ लाख टेस्ट झाल्या आहेत, तर रूग्णांच्या संख्येने 6 लाखांचा आकडा ओलांडला आहे.

अमेरिकेतील ताज्या आकडेवारीचा विचार केला तर मागील 24 तासात 1021 लोकांचा मृत्यू झाला आहे, यासोबतच एकुण मृतांचा आकडा एक लाख 8 हजारच्या पुढे गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1.87 मिलियन लोक कोरोना व्हायरसने पीडित आहेत.

जगात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. आतापर्यंत एकुण 67 लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर मरणार्‍यांचा आकडा 3.93 लाखाच्या पुढे गेला आहे.