COVID-19 : ब्राझीलमध्ये वेगाने फोफावतोय ‘कोरोना’ व्हायरसचा धोका, जगातील दुसरा सर्वात ‘प्रभावी’ देश बनला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत असून या बाबतीत ब्राझीलची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. या देशाने शुक्रवारी कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये रशियाला देखील मागे टाकले. आता ब्राझील कोरोना विषाणूच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर प्रथम स्थान अमेरिकेचे आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ३३०,८९० झाली असून आतापर्यंत २१,०४८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये विषाणूच्या परिणामाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, गेल्या २४ तासात तेथे १००१ लोक मरण पावले आहेत. ज्यामुळे मृतांची एकूण संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही दक्षिण अमेरिकेला या महामारीचे “एक नवीन एपिसेंटर” जाहीर केले आहे. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक माइक रयान म्हणाले की, अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती आहे, परंतु सर्वात जास्त परिणाम ब्राझीलमध्ये झाला आहे.

अमेरिकेबाबत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे १,२६० मृत्यू झाले आहेत, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ९५,९२१ वर पोचला आहे. तसेच अमेरिकेत आतापर्यंत १६ लाखाहून अधिक संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय रशियामध्ये एकूण ३२६,४८८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या देशात या विषाणूमुळे आतापर्यंत ३,२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील मृत्यूची संख्या सध्या अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन आणि फ्रान्स नंतर जगातील सहाव्या क्रमांकावर आहे. पण जूनपर्यंत ब्राझीलमधील संकट दूर होण्याची शक्यता दिसत नाही.

तेथील राष्ट्रपती जेयर बोल्सनारो यांनी व्हायरसची तुलना “छोट्या फ्लू”शी केली होती. लोकांना घरात राहण्यास सांगितले म्हणून त्यांनी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांचा निषेध केला. ते म्हणाले की, ते विनाकारण अर्थव्यवस्थेचे नुकसान करत आहेत.