COVID-19 : ‘कोरोना’ला ‘सामान्य’ फ्लू म्हणणाऱ्या राष्ट्रपती बोलसनारो यांची दुसरी टेस्टही पॉजिटीव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसनारो यांच्या अडचणी काही कमी होत नाहीत. सरकारमध्ये प्रचंड विरोधाचा सामना करत असलेले बोलसनारो यापूर्वी कोरोना संक्रमित आढळले होते. मंगळवारी त्यांची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली आणि त्या चाचणीतही ते कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. बोलसनारो यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी करून म्हटले की, ते अजूनही पॉजिटीव्ह आहेत, मात्र त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. बोलसनारो यांनी कोरोनाला ‘सामान्य फ्लू’ म्हटले होते, त्याचप्रमाणे त्यांचा मास्क घालण्यास आणि सोशल डिस्टंसिंगला देखील विरोध होता.

बोलसनारो यांनी राजधानी ब्राझीलिया येथील आपल्या अधिकृत निवासस्थानावरून फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले की, ‘काल सकाळी माझी आणखी एक कोरोना टेस्ट झाली आणि संध्याकाळी त्याचा निकाल आला. मला समजले आहे की मी अद्याप कोरोना पॉझिटिव्ह आहे. ते म्हणाले की, त्यांना ताप आणि श्वास घेण्यास अडचण येणे अशी कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि ते अजूनही अँटी-मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत आहेत. गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाची पुष्टी झाल्यापासून बोलसनारो हे औषधे नियमितपणे घेत आहेत.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत आहेत बोलसनारो
एका वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले कि ‘मी तुम्हाला कोणतेही खास औषध घेण्यास सांगणार नाही. माझे मत आहे की तुम्ही प्रथम एखाद्या डॉक्टरांशी संपर्क साधा. माझ्या बाबतीत सैन्याच्या एका डॉक्टरांनी मला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओने चाचण्या थांबवूनही बर्‍याच देशांनी कोरोनाचा उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरण्यास मान्यता दिली आहे. मात्र हे अँटी-मलेरिया औषध कोविड-१९ प्रकरणात आतापर्यंत कितपत प्रभावी ठरली आहे, हे सिद्ध झालेले नाही. वैज्ञानिक समुदायामध्ये त्याच्या वापराविषयी चर्चा आहे.

६५ वर्षीय बोलसनारो ७ जुलै रोजी कोरोना संक्रमित आढळले होते. ते एका उच्च-जोखमीच्या गटात येतात आणि सध्या ते क्वारंटाइनमध्ये आहेत. यापूर्वी बोलसनारो ब्राझीलमध्ये कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाउनच्या बाजूने नव्हते. सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, घरी राहण्याच्या या रुटीनमुळे ते त्रस्त झाले आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना लवकर बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे एकूण संक्रमितांची संख्या १९.६६ लाख आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत ७५,३६६ लोकांचा मृत्यू झाला आहे.