काय सांगता ! होय, लशीच्या मागणीसाठी देहविक्री करणार्‍या महिलांचा संप; म्हणाल्या – ‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर’

ब्राझीलिया: पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. अशातच ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलांनी एक आठवड्यांचे धरणे आंदोलन सुरू केले असून संपावर गेल्या आहेत. आम्हीही फ्रंटलाईन कर्मचारी असून लसीकरणात आमचाही समावेश करावी अशी मागणी त्यांनी केली.

कोरोनामुळे अनेक हॉटेल बंद केल्याने देहविक्री करणाऱ्या या महिलांना उपजीविकेचे साधन नाही. मिनास गॅरेस राज्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संघटनेच्या अध्यक्षा सीडा विएरा यांनी सांगितले की, आम्ही फ्रंटलाइन कर्मचारी आहोत. आम्हीदेखील अर्थव्यवस्थेचा एक भाग आहोत. त्यामुळे आम्हालादेखील लस घेण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोनामुळे बंद केलेल्या हॉटेलजवळच हे धरणे आंदोलन सुरु आहे. धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, आम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे आम्हाला लशीची आवश्यकता आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वयस्कर आणि आजारी असलेल्यांना लस दिली जात आहे. त्याच धर्तीवर आम्हालाही लस द्यावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.