ब्राझीलच्या शिष्टमंडळाची सोमेश्वर कारखान्यास भेट

पुरंदर : पोलिसनामा आँनलाईन – मागील दहा वर्षात आमच्या क्षमतेत घट होत असून कारखाने कमी होत आहेत. दुसरीकडे भारतात मात्र, साखरेचे उत्पादन वाढत असून कारखानेही वाढत आहेत. भारताच्या प्रगतीचे गमक समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, अशी प्रतिक्रिया ब्राझीलमधील गॅब्रिअल कॅसोल व रूफेला कॅसोल या साडेसहा हजार एकराच्या ऊसउत्पादक जोडप्याने व्यक्त केली.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनग येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ च्या सहकार्याने ब्राझील देशातील अभ्यासकांचे पथक भेट देण्यासाठी आले होते. पथकात ऊस उत्पादक जोडप्यासह काँड्युरमे ईझो, इड्युरडो लँबीयसी हे साखर वितरण कंपनीचे प्रतिनिधी तर हारोहडो टोरेस हे शासनाचे साखर विभागाचे अर्थतज्ज्ञ उपस्थित होते. तसेच फ्रान्सीस्को बारोस, ऑरलँडो लिस्बोआ हे उपपदार्थ निर्मिती कंपनीचे मालक तर रोड्रीगो फर्नांडेस हे दहा हजार एकराचे ऊस उत्पादक शिष्टमंडळात होते.

सोमेश्वर कारखान्याचे चेेेअरमन पुरूषोत्तम जगताप, व्हा.चेेेअरमन लालासाहेब माळशिकारे यांच्या हस्ते ब्राझीलीयन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सुभाष धुमाळ, बापूराव काकडे यांच्यासह सर्व संचालक व अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली.

अभ्यास पथकाने निंबूत येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ऊस लागवड ते ऊसतोड या टप्प्याची माहिती घेतली. व्हीएसआयचे शुगर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे यांनी या दौऱ्यासाठी पुढाकार घेतला होता. भारतात कारखान्यांचे उत्पादन, साखर उतारा वाढत आहे. उसाच्या जाती विकसित होणे किंवा शेतकरी जागरूक होणे यासह कुठल्या कारणांनी हे होत आहे याचा हे पथक अभ्यास करीत आहे, असे चांदगुडे यांनी सांगितले.

पथकातील ओरलँडो अल्मेडिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ब्राझीलपेक्षा सहवीजनिर्मिती व बायोगॅसमध्ये येथील कारखाने पुढे गेले आहेत. आमच्याकडे साखर आणि इथेनॅाल असून इथेनॅालवर शाम्पू, बायोबॅाटल अशा गोष्टी तयार होतात. भारतात आमच्यापेक्षा कारखाने व शेतकरी छोटे आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी इथे कारखान्यांना जोडले आहेत. आमच्याकडे थोडे शेतकरी कारखान्यांना ऊस देतात. इथला सहकारी तत्वाचा अभ्यास आम्हाला करावयाचा आहे. भारतात साखर किती तयार होणार यावर आम्ही आता इथेनॅाल बनवायचे की साखर हे ठरवत असतो. आता साखरेचे भाव कमी असून साखर विक्री ठप्प झाल्याने आमचे शेतकरी ऊसाकडून अन्य पिकांकडे वळू लागले आहेत. इथे सरकार ऊसाची किंमत निर्धारीत करते आणि तो भाव देणे बंधनकारक असते. ब्राझीलमध्ये भावावर सरकारी नियंत्रण नाही. एकूण उत्पन्नाच्या साठ टक्के रक्कम शेतकऱ्याला दिली जाते अशी माहितीही पथकाने दिली.