दुष्काळाचे चटके… ! महागली भाकर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दुष्काळाची झळ पोहचत आहे. या दुष्काळाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाला आहे, त्यामुळे ज्वारी बाजरी सारख्या अन्न धान्याची किंमत जवळपास दुपटीने वाढली आहे. मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये चांगल्या प्रतीच्या ज्वारीचे दर वर्षभरापूर्वी २२ ते २५ रुपये किलो होते मात्र आता ह्याच ज्वारीची किंमत ४८ ते ५० रुपये झाली आहे. तर बाजरीच्या दरात किलोमागे १८ रुपयांवरून २६ ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

ज्वारीच्या कोठारातच  ठणठणाट

महाराष्ट्रात ज्वारी हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. या पिकाकरिता मुबलक पाणी असणे आवश्यक असते, त्यातही सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार मानले जाते. सोलापुरातील ज्वारीला संपूर्ण देशातून मागणी असते. मात्र यंदा दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरण्याच केल्या नाहीत. त्यामुळे ज्वारीचे यंदाचे उप्तादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून ज्वारीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता ज्वारी घरच्यापुरतीच

बाळू डोईफोडे हे अनेक वर्षांपासून शेतीच्या व्यवसायात आहेत. सोलापुरातील बार्शी येथील ते शेतकरी आहेत. यंदा ज्वारीच्या पिकालाच  ग्रहण लागल्याचे ते बोलतात. पाण्याअभावी ज्वारीचे पीक घेणे कठीण झाले आहे. आता एक तर जनावरांच्या चाऱ्यासाठी किंवा घरच्यापुरतीच ज्वारी पिकते त्यामुळे होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते. केवळ जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी आता ज्वारीची लागवड केली जाते, असे ते  सांगतात.

ज्वरिची मागणी जास्त 

स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. अधिक पैसे देऊन राज्यातून ज्या ठिकाणांहून ज्वारी येत होती तिथून ती पुरेशी मिळत नाही. मुंबईइतकीच गुजरातमध्येही ज्वारीला वाढती मागणी आहे, मुंबईपेक्षा या ठिकाणी ज्वारीला मिळणारा दर अधिक असल्याने उत्पादकांचा तिथे माल पाठवण्याकडे असणारा कल अधिक असल्याचे व्यापारी सांगतात.