मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक फोडा : अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या भाजप कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत पार पडली. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक फोडून भाजपच्या मतांची टक्केवारी वाढवण्याचा आदेश अमित शाहांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेररचना व निवडणुकीच्या तयारीचा पक्षीय आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अमित शहा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर मार्गदर्शन केल्याची सूत्रांनी माहिती दिली.

काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांना आकर्षित करण्यात भाजप अपयशी –

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं. मात्र महाराष्ट्रात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पडलेल्या मतांच्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत वाढ झाली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांना आकर्षित करण्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. ही बाब अमित शाह यांनी नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मतांची टक्केवारी वाढवण्याचे आदेश –

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे फारसे आव्हान युतीपुढे नसले तरी विक्रमी बहुमत मिळवून महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एक मजबूत सरकार देण्यासाठी कामाला लागा. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक फोडून भाजपच्या मतांची टक्केवारी वाढवण्याचा आदेश अमित शाहांनी प्रदेश भाजपला दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या ३२ टक्के मतांवरून २० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रणनीती आखण्याचा कानमंत्र अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिला आहे.

शिवसेनेच्याही जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या –

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार आहे. म्हणून केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षांच्याही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा अशीही सूचना अमित शाहांनी या बैठकीत दिली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते उपस्थित होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका