पुण्यात भल्या पहाटे पीएमपी पेटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ब्रेकडाऊन झालेली चालती पीएमपीएमल बस आगारात घेऊन जात असताना पेटल्याची घटना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास कोथरुडमधील भेलके नगर येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. परंतु बसचा अर्धा भाग पुर्णपणे जळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

पीएमपीएमएल बसचे ब्रेकडाऊन नवे नाही. काल रस्त्यात ब्रेकडाऊन झालेली पीएमपीएमएलची बस घेऊन चालक मध्यरात्रीच्या सुमारासा आगाराकडे जात होता. त्यावेळी कोथरुड येथील भेलके नगर परिसरात आल्यावरk बसने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या बसमधून धूर येत असल्याचे तेथून जाणाऱ्या एकाने चाकाला सांगितले. चालकाने तात्काळ बस थांबवली. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून बसमधील आग आटोक्यात आणली. परंतु बसचा अर्धा भाग पुर्णपणे जळाला आहे.