प्रकाश आंबेडकर झाले आक्रमक, म्हणाले – ‘लॉकडाऊन तोडा अन् राज्यातील सर्व दुकाने 1 ऑगस्टपासून उघडा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –    कोरोनामुळे सरकारने लावलेल्या लॉकडाऊनध्ये हातावर पोट असणार्‍यांबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. उलट, लॉकडाऊन लावून ह्या लोकांचे जगणे मुश्किल करत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारचे लॉकडाऊन मान्य करू नका. लॉकडाऊन तोडा, असे आवाहन दुकानदारांना केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दुकनदारांना केलेले आवाहन राज्य सरकारला आव्हान ठरत आहे.

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तमाम दुकानदार आणि नागरिकांना आवाहन केले आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा. लॉकडाऊन मान्य करू नका. कारण, हे सरकार ह्या लोकांच्या जगण्याबाबतची ठोस सोय करत नाही. जर लॉकडाऊन लावायचे असेल तर ह्या सर्व लोकांच्या जगण्याबाबतचे सर्व प्रश्न सोडवा, मग, आम्ही लॉकडाऊनचे पालन करू , अशी भूमिका व्यक्त करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हवं तर सरकारनं माझ्यावर गुन्हा दाखल करावं. मला अटक करावं. मी कशालाही घाबरत नाही, असे आव्हान दिले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात आपल्या लोकसंख्येपैकी फक्त 5 टक्के लोक कोरोनाबाधित होत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहे. येत्या 1 ऑगस्टपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार सुरू करावेत. मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने बकरी ईदसाजरी करावी. तसेच रक्षाबंधन सण देखील मोकळेपणाने साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. तसेच अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी, नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

सध्या कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविला आहे. यात टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर केल्या आहेत. काही सवलतींत वाढ करत राज्यातील मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सेस यांना 5 ऑगस्ट पासून सुरु करण्यास संमती दिली आहे. मात्र, हातावरचं पोट असणार्‍यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.