‘हिंमत असेल तर अनधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा’, जितेंद्र आव्हाडांचं थेट ‘आव्हान’

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन –    आयुक्त डॉ विजय राठोड (Vijay Rathod) तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्य कठोर आहात तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडा आमच्या कार्यकर्त्याचे हॉटले अनधिकृत म्हणून कोणाला खुश करण्यासाठी 3 वेळा तोडले. मी 124 अनधिकृत हॉटेलांची यादी जाहीर करतो. त्यातली 24 हॉटेल तरी तोडायची हिंमत दाखवा असं थेट आव्हान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मीरारोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिलं आहे. मीरा भाईंदर शहर एका व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या मालकीचं नाही असंही ते म्हणाले.

माजी आमदरार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांचं नाव न घेता आव्हाड म्हणाले, “येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत जास्त मोठ्यानं आवाज मी उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो, माजी आमदाराच्या 711 क्लब, सी एन रॉक हॉटेलवर कारवाई करा. तुम्ही खूप प्रमाणिक आणि कर्तव्य कठोर आहात तर ती बांधकामे तोडा. परंतु त्यावर बोलण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची कोणाची हिंमत नाही. आमच्या एका कार्यकर्त्याचं हॉटेल तीन वेळा तोडलं. माझ्याकडे 124 अनधिकृत हॉटेलची यादी आहे. ती मी जाहीर करतो हिंमत असेल तर त्यातील 24 तरी तोडून दाखवावीत. कोणाला खुश करण्यासाठी जर आयुक्त काम करत असतील तर गाठ आमच्याशी आहे” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढं बोलताना ते म्हणाले, “पालिकेतील अधिकारी एका पक्षाचे असल्यासारखे वागतात. कोण अधिकारी काय करतो किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे, कशात भ्रष्टाचार झाला याची संपूर्ण यादी आम्ही खिशात ठेवून फिरतो. आम्हाला आमची कामं करू द्या, तुम्ही तुमची कामं करा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गळा दाबवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही वेडीवाकडी कामे सागंणार नाही, आम्ही रस्त्यावर कार्यालये बांधणार नाही. आम्ही सोसायट्यांची जागा ताब्यात घेणार नाहीत” असंही आव्हाड म्हणाले.