1.5 लाख शेतकऱ्यांसाठी वित्त विभागाकडे 600 कोटींची मागणी ! मार्चपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळणार, सहकार विभागाची माहिती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारने 2 लाखांपेक्षा कमी कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, अद्यापही राज्यातील तब्बल 1 लाख 51 हजार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यांच्यासाठी 613 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी सहकार विभागाने वित्त विभागाकडे केली आहे. शेतकऱ्यांना मार्चपूर्वी कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी माहिती सहकार विभागातील एका वरीष्ठ अधिका-यांने दिली आहे. दरम्यान, 2 लाखांवरील कर्जदार आणि नियमित कर्जदारांसाठी एकूण 25 हजार कोटी रुपयांची रक्‍कम लागेल, अशी शक्‍यता वर्तवली आहे. राज्याची आर्थिक स्थितीचा विचार करता त्याचे तीन टप्पे होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

तत्कालीन फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात 50 हजारांची वाढ करुन 2 लाखांपर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला. दुसरीकडे नियमित कर्जदारांना मागील कर्जमाफीच्या तुलनेत दुप्पट लाभ देण्याची घोषणा झाली. तर 2 लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरु करण्याच्या दृष्टीनेही नियोजन झाले. मात्र, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आणि कर्जमाफीसंदर्भात पुढे काहीच निर्णय झाला नाही. त्यापैकी 2 लाखांपर्यंत कर्जदार असलेल्या दीड लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्याच्या दृष्टीने वित्त विभागाला सहकार विभागाने प्रस्ताव दिला आहे.

सहकार विभागाने संपूर्ण कर्जदारांची माहिती शासनाने नेमलेल्या उपसमितीकडे सोपविली असून या समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर उर्वरित कर्जमाफीसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद होईल, असेही सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे.