‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला, हल्लेखोराला अटक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यावर बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयासमोर एकाने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. दरम्यान या घटनेत ते थोडक्यात बचावले असून त्यांचा स्वीय सहाय्यक जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

जनार्धन दगडू गाडेकर (रा. सावळा) असे ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराचे नाव असून त्यांच्याकडून कुऱ्हाडीसह अन्य एक हत्यारही जप्त केले आहे. तर सौरभ पडघान असे हल्ल्यात जखमी झालेल्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे.

रविकांत तुपकर हे बुधवारी तीन तालुक्यांचा दौरा करून सायंकाळी बुलडाण्यात परतले होते. सायंकाळी त्यांच्या चिखली रोडवरील कार्यालयात ते बसलेले होते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी ते बाहेर आले असता एक व्यक्ती त्यांच्या वाहनाचा नंबर नोंद करून घेत होता. यावेळी तुपकर यांच्या स्वीय सहाय्यक सौरभ पडघान यांनी संबंधिताला हटकले असता तुपकर यांच्यावर जनार्धन गाडेकर यांनी कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार त्यांचे अंगरक्षक गणेश चाटे यांनी रोखला. मात्र दुसरा वार गाडेकर यांनी केला असता कुऱ्हाड उलट्या बाजूने सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तेथे गोंधळ झाला. या घटनेत सुदैवाने तुपकर थोडक्यात बचावले. सौरभ पडघान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.