Solapur News : सोलापूर जिल्हयात ‘बर्ड फ्लू’ची ‘एन्ट्री’, जंगलगीच्या 1 KM मधील कोंबडया करणार नष्ट

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   सोलापूर जिल्ह्यातील जंगलगीमध्ये (ता. मंगळवेढा) कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे शनिवारी (दि.16) स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबधित गावापासून 1 किमी क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच परिसरात बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून 1 किमी अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने या कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

जंगलगीपासून 1 किमी क्षेत्रातील पक्षी, पक्षी खाद्य, अंडी, कोंबडी खत, पोल्टी अनुषंगिक साहित्य देखील शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले जाणार आहे. या भागात देखील कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घातला आहे. जंगलगी, जंगलगी वस्ती, सलगर बु., सलगर खु., आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवणगी ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश होईपर्यंत घोषित केल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.