पंढरपूला जाण्यासाठी वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षाची परंपरा असलेला पालखी सोहळा यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एसटी बसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु आता वारकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाखरी ते पंढरपूर पायी वारी करून द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेत वाखरी ते पंढरपूर दरम्यानचं अंतर 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत चालत जाऊन पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगर प्रदक्षिणा, स्नान, गोपाळकाला, वारीतील या परंपरा पूर्ण करण्यासाठी पौर्णिमेपर्यंत मुक्कामी राहण्याची परवानगीही देण्यात यावी, असंही याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय 29 मे रेजी घेण्यात आला. मात्र, माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. या पादुका बसने किंवा हेलिकॉप्टरने जाणार असा संभ्रम होता. पण आता संभ्रम दूर झाला आहे. माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान शिवनेरी बसमधून होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी सांगितले. 20 मानकऱ्या समवेत 30 जूनला सकाळी 10 वाजता माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.