गडचिरोलीत चकमक ! C-60 कमांडोंकडून 5 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली जिल्ह्यातील कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.

कसनेलीच्या जंगलात सी- 60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षातील माओवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. यात दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी ( दि. 15 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती.
नारेकसा जंगल परिसरात c- 60 पथकाचे जवान माओवादीविरोधी अभियान राबवत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून परिसरात शोध मोहिम रावण्यात आली . एक पुरुष आणि एका महिला माओवाद्यांचा मृतांमध्ये समावेश होता.