‘लोकमान्य टिळक टर्मिनस’वर (LTT) स्फोटके आढळल्याने ‘खळबळ’ ; सरकारला ‘धमकी’चे पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी केली जात असताना आज लोकमान्य टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेस या रेल्वेमध्ये स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटकांसोबत भाजप सरकारला धमकी देणारं पत्रही मिळालं आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीसही टर्मिनसवर दाखल झाले आहेत.

हावडा लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेस गाडी सकाळी दोन तास उशीरा म्हणजे सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचली. रेल्वेतील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही गाडी कारशेडमध्ये दाखल झाली. त्यानंतर सफाई कर्मचारी सफाईसाठी गेले. तेव्हा या गाडीत कर्मचाऱ्यांना एका बॅगमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळल्या. त्यांनी तातडीने आरपीएफला कळवलं. तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्फोटके निकामी केली. त्यानंतर संपुर्ण लोकमान्य टर्मिनसचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. दुपारी बारा वाजल्यापासून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान लोकमान्य टर्मिनसमध्ये ही स्फोटके कशी आली याचा शोध पोलीस घेत आहेत.

स्फोटकांसोबत मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठ्यांमुळे खळबळ
स्फोटकांसोबत काही चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजप सरकारविरोधात काही मजकूर या चिठ्ठ्यांमध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास केला आहे.