2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांनी फेर याचिका दाखल करण्यास दिला नकार, PAK चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानी तुरुंगात कैद असून नुकताच पाकिस्तानने त्यांच्याबद्दल दावा केला आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांनी फेर याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे.

कुलभूषण यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून तो दावा भारताने मात्र खूपदा फेटाळला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथे हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण यांना अटक केली होती. नंतर २०१७ मध्ये हे प्रकरण भारताने आयसीजेकडे सोपवले. तसेच मागील वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश देण्याच्या आणि फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्यास सांगितले.

दरम्यान ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी ३ मे रोजी कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी बॅक चॅनलवरून सरकारला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा केला होता. हरीश साळवे हे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय समुपदेशक होते आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत. पाकिस्तानच्या न्यायालयाने जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

साळवे असेही म्हणाले होते की, ‘आम्ही आशा केली की, जर मागच्या दाराने त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केली तर आम्ही त्यांना पटवून देऊ. आम्ही त्यांना मानवतेच्या आधारे सोडून देण्याविषयी बोलत होतो. पण तसे झाले नाही. कुलभूषण जाधव यांचे प्रकरण पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा विषय बनले होते.’