ऑक्सिजनच्या काळा बाजारावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितली ‘वस्तुस्थिती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विस्फोट झाला असून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात अकरा लाखाच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, पुणेसह सहा ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरु करण्यात येणार आहेत.

ऑक्सिजनचा काळा बाजार

राज्यात काही शहरामध्ये ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकांना 19 रुपयांपेक्षा अधिक दराने कोणी ऑक्सिजनची विक्री करत असेल तर औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी. काळा बाजार करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुढील काळात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी नवीन केंद्र सुरु करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

बेड अडवून ठेवत असतील तर कारवाई

राज्यात काही ठिकाणी पुणे, नागपूर शहरात आयसीयू व्हेन्टिलेटर बेड मिळत नाही, हे खरे आहे. मात्र मुंबईत तशी परिस्थिती नाही. खासगी रुग्णालयात जास्त पैसे देऊन काही लोक बेड अडवून ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आरोग्य विभाग यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहे. ग्रामीण भागात डीपीडीसी आणि आमदार, खासदार फंडातून आयसीयू बेड उपलब्ध करुन देण्यास प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा ‘कोरोना’

अहमदाबाद, नोएडा नंतर आता मुंबईची चिंता वाढणारी घटना समोर आली आहे. कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पाहून डॉक्टर हैराण झाले आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर पुन्हा हा संसर्ग उलटून आला आहे. मुंबईत चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.