धक्कादायक ! संपर्कानंतर देखील नाही मिळाली रूग्णवाहिका, पुण्यात एकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी वारंवार संपर्क साधूनही अ‍ॅम्ब्युलन्स न आल्याने एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नाना पेठेत शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारात ही घटना घडली. यशूदास मोती फ्रान्सिमस (वय-54) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

कोरोनामुळे शहर रेड झोनमध्ये असून विविध हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. त्यामध्ये नानापेठेचाही समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नाना पेठमध्ये राहणारे यशूदास मोती फ्रान्सिस यांची प्रकृती खालावली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने फ्रान्सिस कुटुंबीयांनी तब्बल अडीच तास आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी संपर्क साधला.

या दरम्यान, यशूदास मोती फ्रान्सिस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी डुल्या मारोती चौकात आणले होते. एवढंच नाही तर शेजारी पोलिस चौकी असूनही फ्रान्सिस कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणीही मिळाले नाही. नंतर 100 व 108 या क्रमांकावर संपर्क साधून अ‍ॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्रा, कोरोनामुळे अ‍ॅम्ब्युलन्स मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. अखेर अ‍ॅम्ब्युलन्स न आल्याने उपचाराअभावी यशूदास मोती फ्रान्सिस यांची रस्त्यावरच प्राणज्योत मालवली. पावणे पाच वाजता भाजी वाहतूक करणार्‍या टेम्पोमधून फ्रान्सिस यांना ससून हॉस्पिटलमघ्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.