Pune : कोविड टेस्टींग सेंटरवर राडा ! ‘स्वॅब’ घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टींग सेंटरवर राडा झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित अधिकाऱ्यानं टेस्ट किट संपल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांचा ताबा सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. एवढंच नाही तर संतप्त नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टींग सेंटरवर नागरिक सकाळपासून कोविड टेस्टसाठी रांगेत उभे होते. परंतु दुपारी टेस्ट किट संपल्याचं नागरिकांना सांगण्यात आलं. हे ऐकल्यानंतर नागरिकांचा पारा चढला. नागरिकांनी सेंटरवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. रागाच्या भरात त्यांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. धक्कादायक बाब अशी की, यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचेही स्वॅब होते अशी माहिती समजत आहे. या प्रकरणी आता पुणे महापालिकेकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

दुसरीकडे पुण्यातील आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृह येथे टेस्ट केल्या जात होत्या. तिथे अँटीजन किट संपल्यामुळं आमची टेस्ट आधी करा अशी मागणी करत काही नागरिकांनी स्वॅब घेणाऱ्या कर्माचाऱ्याच्या अंगावर धावून जात घेतलेले स्वॅबही लाथा मारून पाडून दिले.

यामुळं कर्मचाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 3 नागरिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना स्वॅब टेस्टींगसठी टार्गेट दिल्यानं असे प्रकार घडत आहेत असा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसचे गटनेते यांनी केला आहे.