संतापजनक ! 10 रूपयांचं आमिष दाखवून 5 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार, महाराष्ट्रातील घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दहा रुपयांचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या ५९ वर्षीय नराधमाने ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धारावीत ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

या घटनेची माहिती पीडित चिमुरडीने आपल्या आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबद्दल तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी शेजारच्याने मुलीला बोलवून घेतले. तिला १० रुपये दिले आणि गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर नराधमाने तिच्यावर अत्याचार केले, असे तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या हातात दहा रुपयांची नोट बघितल्यावर आईचे तिला याबाबत विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने धारावी पोलीस ठाणे गाठले आरोपीविरुद्ध तक्रार नोंद केली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती धारावी ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने दिली.

कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार…

तथापि, दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

ठाण्यातील मीरा रोड परिसरात असलेल्या कोविड सेंटर आहे. तिथे २० वर्षीय पीडित महिला आपल्या १० महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत विलगीकरणात होती. आरोपी पीडितेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत जात असे. काही दिवसांनी या नराधमाने लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. दरम्यान, आपल्या कुटूंबाची बदनामी होईल या भीतीपोटी महिलेने तक्रार दाखल नव्हती. मात्र, अखेर संतापाचा उद्रेक झाल्यावर या महिलेने शनिवारी नवघर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंद केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.