Breaking : पुण्यातील शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच – महौपार (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे गेल्या 8 दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाचे नवे पॉझटिव्ह आढळून येत आहे. दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन देखील यापुर्वी प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे. 14 मार्च नंतर शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू होणार की नाही याबाबतचा निर्णय नंतर त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या तरी मनपाच्या हद्दीतील सर्वच शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.