उद्यापासून 2 हजार भाविकांना घेता येईल श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना टाळेबंदीमुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून (दि. १६) सुरू करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सुरू झाले. मात्र, कोरोनाचा प्रसार पाहता एका दिवसात केवळ १००० भाविकांना विठ्ठलाचे मुख दर्शन देण्याचे ठरले होते. मात्र, आता या संख्येत १ हजाराने वाढ करण्यात आली असून, बुधवारपासून (दि. १८) २ हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेता येईल.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फक्त मुख दर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन दर्शन प्रणाली सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी भाविकांना मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य आहे. त्यानुसार दैनंदिन जास्तीत जास्त १००० भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, भाविकांकडून होणारी मागणी विचारात घेता, आता दैनंदिन भाविकांच्या संख्येत १ हजारने वाढ केली आहे.

यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, १८ नोव्हेंबर २०२० पासून मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढवून २००० करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्याकरता १० तासांचे भाग निश्चित करण्यात आले असून, प्रत्येकी एका तासाला आता २०० भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेता येणार आहे.