महिलांनी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेणे आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन – महिलांमध्ये वयाची ४५ वर्षे पार केल्यानंतर स्तनाच्या कर्करोगाची समस्या जास्त प्रमाणात आढळते. मात्र, अलिकडे वयाच्या तिशीनंतरच महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत चालल्याचे दिसत आहे. हा महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या अहवालानुसार भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस जलद वाढत आहेत. महिलांनी या आजाराविषयी माहिती करून घेणे आवश्यक असून याची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

कारण स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीचे संकेत ओळखून पहिल्या स्टेजमध्येच उपचार सुरू केला तर रूग्ण बरा होण्याची शक्यता ८० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दुसऱ्या स्टेजमध्ये इलाज सुरू झाल्यावर ६०-७० टक्के महिला ठीक होतात. तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये याची माहिती मिळाल्यावर ही समस्या नियंत्रणात ठेवणे खूप अवघड होते. यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे संकेत ओळखणे खूप आवश्यक असते.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखल्यास वेळीच उपचार करता येतात. जर स्तनाच्या आकारामध्ये अचानक बदल जाणवत असेल एक स्तन दुसऱ्याच्या तुलनेत वाढत असेल तर हा स्तनाचा कर्करोगाचा संकेत असू शकतो. स्तनामध्ये सूज येत आणि टिश्यूज अचानक जाड होत असतील तर दुर्लक्ष करू नये. हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे. स्तनात वेदना आणि स्तन अचानक मुलायम होत असतील तर दुर्लक्ष करू नये.

अनेकांच्या बाबतीत गाठीमध्ये वेदना होत नाहीत, परंतु काही रुग्णांना वेदना होतात. काखेत सूज येणे हेसुद्धा स्तनाच्या कर्करोगाचे एक लक्षण आहे. स्तनात एखाद्यी गाठ असल्याचे समजले तर हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. या गाठीमध्ये वेदना होऊ शकतात. मात्र, अनेकदा काही वेळ वेदना होत नाही. स्तनाच्या आजूबाजूच्या त्वचेमध्ये बदल जसे पुरळ, चट्टे, त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या पडणे अशी लक्षणे आढळतात. तसेच निप्पलमध्ये बदल दिसून येतो.

म्हणजेच निप्पलचा रंग काळा होणे, खाज येणे, वेदना आणि जळजळ हे कर्करोगाचे लक्षण आहे. निप्पलमधून पांढरा द्रव किंवा इतर रंगाचा द्रव येणे किंवा रक्त येणे हे स्तनाच्या कर्करोगाची लक्षण आहे. शिवाय अचानक वजन कमी झाले, आहार आणि जीवनशैलीत बदल झाला तर हेदेखील स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. हाडांमध्ये वेदना, भूक न लागणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणे ही सुद्धा स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असून अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/