१२ लाख लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पाेलीस निरिक्षक (API), पाेलिस कर्मचाऱ्यासह (POLICE) तिघांवर गुन्हा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या तलासरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कॉनस्टेबल आणि एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात सोमवार (दि.३१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र नरोटे, पोलीस कॉनस्टेबल संदीप राजगुरे, खासगी इसम बजरंग शाह असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या विरुद्धच्या अर्जामध्ये बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल न करण्यासाठी राजेंद्र नरोटे याने १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये १२ लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. तसेच पोलीस कॉनस्टेबल याने खासगी इसमामार्फत १५ लाख रुपयांची लाच मागितली. याची तक्रार तक्रारदाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे १४ डिसेंबर रोजी केली होती. १७ डिसेंबर रोजी पथकाने याची पंचासमक्ष पडताळणी केली असता यामध्ये तिघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सोमवारी (दि.३१) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.