5 हजाराची लाच स्विकारताना सहय्यक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – अटक न करण्यासाठी १० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ५ हजार रुपये स्विकारताना मंठा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जालना पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मुशिरखान कबीरखान पठाण (वय-५२ रा. जालना) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद आहेत. याच वादातून तक्रारदाराच्या पत्नीने मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पठाण याने काही दिवसांपूर्वी तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडीलांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर तुमच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल अशी भीती पठाण याने तक्रारदाराला घातली. अटक टाळण्यासाठी पठाण याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रादाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता पठाण याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी पोलीस ठाण्यात सापळा रचून पठाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. पठाण याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त