कंत्राटदाराकडून 11 हजारांची ‘दक्षणा’ घेताना कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मोर्शी : (अमरावती) पोलीसनामा ऑनलाइन –  कामाच्या देयकावर सही तसेच पोल्ट्री फार्मच्या कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल ११ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या मोर्शी येथील कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून धर्मेंद्र मुगुटराव मानकर (५५) असे या अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एन.एस.सी. इन्फ्रा स्कीम अंतर्गतचे बारगाव, जरुड, पेठ मंगरुळी गावामध्ये केलेल्या कामाच्या देयकावर सही करून एक टक्का रक्कम सहा हजार व घोडदेव गावातील पोल्ट्री फार्मच्या कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल पाच हजार असे एकूण ११ हजार रुपये लाचेची मागणी वरूड येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय वीज कंत्राटदाराकडे केली होती. त्यानंतर कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी सापळा रचण्यात आला. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील कक्षात मानकर बसला होता. तेथेच त्याने कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. धर्मेंद मानकरवर यापूर्वीसुद्धा लाच मागितल्याचे समजते.

या कारवाई पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, सुनील जायभाये, पंकज बोरसे,वाहन चालक सतीश किटुकले आदींचा सहभाग होता. मानकरविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (२६ जुलै २०१८ चे सुधारणा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.