Aurangabad News : लाचखोर सहकार अधिकारी ACB च्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मत्स व्यवसाय सहकारी संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी 20 हजाराची लाच घेणा-या सहकार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. 2) श्रीनिकेतन कॉलनीच्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

वाल्मीक माधवराव काळे (56) असे लाचखोर सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मत्स व्यवसाय सहकारी संस्था आहे. या संस्थेविरूध्द अनेक तक्रारी मत्स आणि दुग्ध विकास कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार संस्थेची चौकशी सहकार अधिकारी काळे करीत होते. यामुळे तक्रारदार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी काळे यांनी संस्थेवरील कारवाई टाळून त्यावर प्रशासक न नेमण्यासाठी 20 हजाराची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार देत काळेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. मंगळवारी दुपारी श्रीनिकेतन कॉलनी येथे सापळा रचून काळे यास तक्रारदारांकडून 20 हजाराची लाच घेतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार उपअधीक्षक बी. व्ही गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी अरुण उगले, दिगंबर पाठक आणि प्रकाश घुगरे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे.