4000 रुपयांची लाच स्विकारताना विधी व न्याय विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना विधि व न्याय विभागाच्या चपराश्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती चौकात सापळा रचून करण्यात आली. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (वय-45) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चपराश्याचे नाव आहे.

सलीम हा जिल्हा न्यायालय परिसरातील विधी व न्याय विभागाच्या जिल्हा विधि सेवा प्राधिकरण येथे चपराशी आहे. तो पूर्वी कामाठी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कार्यरत होता. तर तक्रारदार हे भंडारा येथील खातरोड येथील रहिवाशी असून त्याच्या पत्नीने त्याच्यासह आई-वडीलांविरुद्ध हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली आहे. सलीम याने तक्रारदाराला समेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सलीमने तक्रारदाराकडे संपर्क साधून लाचेची मागणी केली. लाच दिली नाही तर वॉरंट काढण्याची धमकी दिली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी सलीम याने लाचेची रक्कम छत्रपती चौकात बोलावून घेतले. पथकाने चौकामध्ये सापळा रचून सलीमला अटक केली. या कारवाईमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्याची कामाठीतून जिल्हा न्यायालयात बदली झाल्याने त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस हवालदार सुवील कळंबे, रविकांत डहाट, लक्ष्मण परतेकी, वकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com