लाचखोर फरारी पोलिस हवालदाराची महिन्यानंतर ‘शरणागती’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अत्याचाराचे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात गेले महिन्याभर फरार असलेला लाचखोर हवालदाराने अखेर सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासमोर शरणागती पत्करली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचा हवालदार कैलास रामप्रसाद पवार असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी भागात राहणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला होता. याप्रकरणाची चौकशी पवार व त्याचे सहकारी गणेश चव्हाण यांच्याकडे सोपविली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु केल्यावर त्यांनी तरुणाच्या नातेवाईकाला प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तरुणाच्या नातेवाईकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांनी १९ डिसेंबर २०१९ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील चहाच्या टपरीवर लाच घेताना चव्हाण याला पकडले होते. हे समजताच तेव्हापासून कैलास पवार हा फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने पवार याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर तो सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –