Solapur : लाचखोराला पकडण्यासाठी सापळा रचला, पण ‘तो’ 70 हजार घेऊन पळाला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सापळा (ट्रॅप) रचला जातो. जेव्हा एखादा लाचखोर अधिकारी-कर्मचारी लाच स्वीकारतो तेव्हा त्याला पकडले जाते. अशाप्रकारे कारवाई करताना मात्र भलताच प्रकार घडला. यामध्ये सापळ्यातूनच चक्क 70 हजारांची रोकड पळवून नेण्यात आली.

पंढरपूर येथील अवैध वाळू उपसा आणि वाळू तस्करीप्रकरणात अमर पाटील या आरोपीविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात अमर पाटील याला दुसर्‍यांदा पोलिस कोठडी न मागण्यासाठी व गुन्ह्याच्या कामात पोलिसांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी एका व्यक्‍तीने 4 लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी 70 हजार रुपये घेताना विशाल काटे या संशयिताविरुद्ध सापळा रचला होता. त्यावेळी विशाल काटे आपल्या तीन साथीदारांसोबत आला होता. मात्र, त्याला पकडण्यापूर्वीच तो साथीदारांसोबत 70 हजार रुपये घेऊन पळाला, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

अमर पाटील याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर एका व्यक्‍तीने अमर पाटील याच्या भावाशी संपर्क साधला. त्याने पोलिस अधिकार्‍यांशी चांगले संबंध असून, 4 लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. तेव्हा आरोपीचा भाऊ तयार झाला. 4 लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून 2 लाख देण्याचे ठरले. त्यापैकी 70 हजार रुपये मंगळवारी (दि. 27) देण्याचे ठरले. त्यानंतर आरोपीच्या भावाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा लावला.

लाच घेण्यासाठी संशयित विशाल काटे हा अन्य तिघांसमवेत तेथे आला. त्यांनी आरोपीच्या भावाकडून 70 हजारांची लाच घेतली. त्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी पकडण्यासाठी येण्यापूर्वीच कारमधून चौघेजण 70 हजारांच्या लाचेच्या रकमेसह पळून गेले. दरम्यान, आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारली असल्याने त्याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.