1 लाख रूपयांचं लाच प्रकरण ! सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह 2 पोलिस कर्मचार्‍यांवर अ‍ॅन्टी करप्शनचा ‘ट्रॅप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात एसीबीने मोठी कारवाई करत महिला सहायक निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना १ लाख रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने बीड जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अ‍ॅट्रोसिटीच्या अर्ज प्रकरणात मदत करण्यासाठी लाच घेताना कारवाई झाली आहे. दरम्यान, लाच घेतल्यानंतर कर्मचारी लाचेची रक्कम घेऊन पसार झाला आहे. तर महिला सहाय्यक निरीक्षक देखील पसार आहे.

माधुरी महादेवराव मुंढे (वय ३२), संजय त्रंबक भेंडेकर (वय ५३) आणि प्रेमदास दयाराम पवार (वय ३७) अशी या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला सहाय्यक निरीक्षक माधुरी मुंढे या परळी वैजनाथ शासकीय रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तर पोलिस हवालदार संजय व पोलीस शिपाई प्रेमदास हे देखील याच पोलीस ठाण्यात आहेत.

यातील ४५ वर्षीय तक्रारदार यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा अर्ज आला आहे. या अर्ज प्रकरणात मदत करत अर्जदार करणाऱ्या संबंधित व्यक्तीला तो अर्ज मागे घेवून गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्टेशन येथील कँटीन चालवू देण्यासाठी तिघांनी १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा पोलिस हवालदार संजय याला १ लाख रुपयांची लाच घेताना पथकाने पकडले. यादरम्यान मात्र लाचेची रक्कम घेऊन पोलिस हवालदार संजय हा तेथून पसार झाला. तर रात्रीची वेळ असल्याने महिला सहाय्यक निरीक्षक यांना पकडण्यात आले नाही. यानंतर त्याही पसार झाल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर पोलिस शिपाई प्रेमदास याला अटक केली आहे.

नांदेड विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस सहायक निरीक्षक अमोल कडू, पोलिस निरीक्षक जमील जहागीरदार, अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद यांनी ही कारवाई केली आहे.