1000 रुपयांची लाच स्विकारताना मुद्रांक विक्रेता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेगाव : पोलीसानामा ऑनलाइन – हक्कसोडपत्र नोंदवण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना शेगाव येथील मुद्रांक विक्रेत्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरातील मुद्रांक विक्रेता कार्यालयात करण्यात आली. सुधीर परशुराम बावसकर (वय-47) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुद्रांक विक्रेत्याचे नाव आहे.

शेगाव शहरातील 32 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तक्रारदार यांचे हक्कसोडपत्र नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधक यांना देण्यासाठी बावसकर याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीमध्ये सुधीर बावसकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी दुपारी तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्विकारताना बावसकरला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक यांची देखील पडताळणी केली असता त्यांनी लाचेची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव, पोलीस नाईक विलास साखरे, मोहमद रिजवान, पोलीस शिपाई जगदीश पवार, चालक पोलीस शिपाई मधुकर रगड यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

visit : policenama.com 

You might also like