काय सांगता ! होय, पोलिस निरीक्षकानं चक्क हवालदाराच्या डोक्यात घातली वीट

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात जात पडताळणी समितीमधील हवालदाराच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वादावर आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नितीन अंकुश माने (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार रामा मुकाप्पा कोळी (वय-30 रा. जवान हाऊसिंग सोसायटी, सदरबाझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळी यांची पोलीस मुख्यालयात नेमणूक आहे. सध्या त्यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये नेमणूक देण्यात आली आहे. नितीन माने हे त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत.

कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.11) माने यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये वाद घातला. तसेच मला शिवीगाळ केली. तुला दाखवतोच, तुझी नोकरी घालवतो, मी पोलीस निरीक्षक आहे. मी काही केले, तरी माझे कोण काय करणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस चौकीच्या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेली वीट माने यांनी माझ्या डोक्यात व उजव्या हातावर मारून जखमी केले.

पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्याने सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर सातारा पोलीस दलात होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेवाळे करीत आहेत.