लॉकडाऊनमध्ये लग्न : नवरा अन् नवरीनं घातलं ‘मास्क’, व्हिडीओ कॉलवरून पाहुण्यांनी दिले ‘आशिर्वाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील सूरत येथे राहणार्‍या एका कुटुंबामध्ये 16 एप्रिल रोजी लग्न होणार होते, हे लग्न राजस्थानमध्ये होणार होते. ज्यात 300 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 25 मार्चपासून सुरू असलेला लॉकडाउन आणखी पुढे ढकलण्यात आला. अशा परिस्थितीत गुरुवारी वधू-वर घराच्या गच्चीवर मास्क लावून मंडपांमध्ये बसले आणि पाहुण्यांनी व्हिडिओ कॉलवर वधू-वरांना आशीर्वाद दिला.

सूरत येथे राहणारे दिशांत पूनमिया आणि पूजा बरनोताचे लग्न 6 महिन्यांपूर्वी 16 एप्रिल रोजी निश्चित झाले होते. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे होते, त्यामुळे लग्न राजस्थानात होणार होते ज्यात 300 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

या कुटूंबाला आशा होती की, 14 एप्रिलला लॉकडाऊन संपले तर धुमधडाक्यात लग्न होईल परंतु लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आले. अशा परिस्थितीत आता या कुटुंबाने ठरवले की आता ठरलेल्या तारखेलाच त्यांचे लग्न करायचे.

गुरुवारी वधू-वर, पंडित, मुलगी आणि मुलीच्या पालकांनी मुलीच्या घरी लग्नाला हजेरी लावली आणि लग्नाचा संपूर्ण सोहळा अवघ्या अर्ध्या तासात पार पाडला. व्हिडिओ कॉलद्वारे पाहुण्यांनी या लग्नात हजेरी लावली आणि या अनोख्या लग्नाचे साक्षीदार झाले. वधू-वर यांनी लग्नात मास्क आणि हातामध्ये ग्लव्स घातले होते.

साध्या पद्धतीने लग्न करण्याच्या प्रश्नावर वधू-वर म्हणाले की, आमची धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा होती, परंतु लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आम्ही हे पाऊल उचलले आणि घरी राहून लग्नाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली.