‘अशी’ झाली वधूची लग्नमंडपात एन्ट्री ; सर्वांच्याच भुवया उंचावल्या 

केडगाव (दौंड) : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न म्हटंल अनेक वेगवेगळे ट्रेंड आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. काहीतरी वेगळे करण्यावर अनेकांचा धडाकाच असतो. असाच काहीसा एक वेगळा प्रकार एका लग्नात पाहायला मिळाला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील एका लग्नात एक आगळावेगळा थाट पाहायला मिळाला. इथल्या शहाजी देशमुख या शेतकर्‍याने आपल्या कोमल या मुलीला घरापासून विवाहस्थळापर्यंत बुलेटवर आणत तिची हौस पूर्ण केली.
अनेकदा मुलगी म्हटलं त्यांना कमी लेखलं जातं किंवा त्यांना दुय्यम दर्जाही दिला जातो. काहींना तर असे वाटते की, मुलगी म्हणजे आेझंच आहे. असे सगळे समज गैरसमज असतानाच शहाजी देशमुख यांनी या आगळ्यावेगळ्या बुलेट सवारीतून मुलीही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचं दाखवून दिलं आहे. दौंड तालुक्यातल्या केडगाव इथल्या आर्यन लॉन्स मंगल कार्यालयात येथील शेतकरी शहाजी देशमुख यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता.
सकाळपासून नातेवाईक, मित्र परिवार, पाहुणेरावळे लग्नासाठी जमा झाले होते. नवरदेव, नववधू येण्याची अनेकजण वाट पाहत होते. एरवी कोणत्याही लग्नात साधारणपणे नववधू चारचाकीतून येताना पाहायला मिळतं. मात्र या लग्नात नववधू कोमल ही स्वत: बुलेटवरुन आलेली पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर एखादी मुलगी दुचाकी किंवा चारचाकी चालवत असेल तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण हे काही नवीन नाही. परंतु असे असले तरी  चक्क स्वत:च्या लग्नात नववधूने बुलेटवरुन येणं हे सर्वांसाठी नक्कीच काहीतरी वेगळं होतं. हे दृश्य म्हणजे सर्वांसाठी सुखद धक्का देणारं होतं.
शहाजी देशमुख यांची मुलगी नववधू कोमल हिने आपल्या लग्नात बुलेटवरुन येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांनीही मोठ्या मनाने तिच्या या बुलेट सवारीसाठी परवानगी दिली. त्यानुसार सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाह स्थळापर्यंत स्वत: बुलेट चालवत दाखल झाली.

मुलगी जन्मली की समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडतात. अनेक मुलीला दुषणे दिली जातात. मात्र केडगावच्या देशमुख कुटुंबीयांनी मात्र मुलीची हौस पूर्ण करत एक वेगळा संदेश दिलाय. त्याचवेळी नववधू कोमलची बुलेटवरुन झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली.

एकूणच देशमुख कुटुंबीयांनी आपल्या मुलीची हौस पूर्ण करुन आजच्या काळात मुलगा-मुलगी भेद करु पाहणार्‍या समाजाला जबरदस्त चपराख दिलीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.